हरयाणामधील गुरुग्रामजवळ मुंबई एक्स्प्रेस वेवर आज एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक भरधाव ट्रक नियंत्रण सुटून उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळला. हा ट्रक खाली कोसळताच मोठा स्फोट झाला तसेच त्यात भीषण आग लागली. या आगीमध्ये ट्रकमधील लाखो रुपयांचं सामान जळून खाक झालं.
या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा ट्रक खूप वेगात येत होता. यादरम्यान, चालकाचं या ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. हा ट्र्क अॅमेझॉनच्या डिलिव्हरी पार्टनरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक सामान, होम डिलिव्हरीचं सामान आणि इतर महागड्या वस्तू भरलेल्या होत्या. हा ट्रक अपघात होऊन खाली पडताच त्याला आग लागली आणि संपूर्ण ट्रक जळू लागला.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाची तीन वाहने घटनास्थळी पोहोचली. तसेच त्यांनी खूप प्रयत्नपूर्वक आगीवर नियंत्रण मिळवले. या ट्रकला लागलेल्या आगीच्या ज्वाळा एवढ्या भयंकर होत्या की, त्यामुळे आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा धुराने भरून गेला. तसेच या आगीत ट्रकमधील ड्रायव्हर आणि त्याचा अन्य सहकारी होरपळले आहेत. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.