नवी दिल्ली - उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीचं कारण देत त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. धनखड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. विशेष म्हणजे राज्यसभा सभापती असलेले जगदीप धनखड यांचा राजीनामा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आला. त्यातच उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्यानंतर काही तास सरकारकडूनही यावर अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. विरोधकांनी जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावरून प्रश्नचिन्ह उभे करत केंद्र सरकारला घेरणे सुरू केले. त्यामुळे जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं खरे कारण काय हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
महाभियोग मुद्द्यावर चर्चा, राजीनाम्याची स्क्रिप्ट
धनखड यांच्या राजीनाम्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. कुणी न्यायव्यवस्थेविरोधात उघड केलेली जाहीर नाराजी जबाबदार असल्याचे सांगते तर कुणी सरकारी धोरणांविरोधात टीप्पणी करणे भोवले असं म्हणते. अलीकडच्या काळात विरोधी पक्षातील खासदारांसोबत त्यांच्या वाढत्या भेटीमुळेही सरकार अस्वस्थ होते असे बोलले जाते. न्यूज १८ रिपोर्टनुसार, जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं कारण न्याय. वर्मा यांच्याविरोधात महाभियोग मुद्द्यावर सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांसोबत फोनवर झालेला वाद कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे.
या रिपोर्टमध्ये धनखड यांच्या राजीनाम्याचे अंतिम कारण म्हणजे सोमवारी संध्याकाळी एका वरिष्ठ मंत्र्याशी त्यांचा फोनवरून झालेला वाद. यामध्ये न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध ६५ हून अधिक विरोधी खासदारांनी सादर केलेल्या महाभियोग प्रस्तावाला स्वीकारण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सरकारला या हालचालीची माहिती नव्हती असे म्हटले जात आहे. दुसरीकडे धनखड यांनी राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांच्या संवैधानिक अधिकारांचा हवाला देत हा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि किरेन रिजिजू दोघेही धनखड यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे गोष्ट अधिकच गंभीर बनली होती.
विरोधी खासदारांची जवळीक?
१५ जुलै रोजी उपराष्ट्रपती कार्यालयाने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्ही-पी एन्क्लेव्ह येथे जगदीप धनखड यांची भेट घेतल्याचा ४४ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला. गेल्या रविवारी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी धनखड यांनी आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि बैठकीचे फोटो पोस्ट केले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की केजरीवाल खासदार नाहीत. विरोधकांसोबत वाढत्या बैठका मोदी सरकारविरोधातील नाराजीचा भाग होती असं सांगितले जाते.