काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील धराली येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झाली होती. दरम्यान, आता अशीच दुर्घटना जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात घडली आहे. येथील पद्दर उपविभागातील चिशोटी गावात मचैल माता यात्रा मार्गावर ढगफुटी होऊन झालेल्या दुर्घटनेत सुमारे १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे घटनास्थळी भीतीचं वातावऱण निर्माण झालं आहे. मदत आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या दुर्घटनेनंतर अनेक लोक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
याबाबत अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, या घटनेबाबत मला जम्मू काश्मीर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा यांनी माहिती दिली. त्यानंतर मी किश्तवाडचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांच्याशी दुर्घटनेबाबत चर्चा केली. चिशोटी परिसरात ढगफुटीची मोठी घटना घडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असण्याची भीती आहे. बचाव पथकाला घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहे. तसेच झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी व्यवस्था केली जात आहे.
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितले की स्थानिक पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्याला वेग देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, उपराज्यपालांना मृतांप्रति दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधरावी यासाठी प्रार्थना केली आहे.