आम आदमी पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अडचण वाढताना दिसत आहे. हरियाणातील सोनीपत येथे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणा सरकारने यमुनेत विष मिसळल्याच्या त्यांच्या विधानावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात, हरियाणा सरकारने आपत्ती व्यवस्थापन कलम 2D, 154 अंतर्गत सोनीपत येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. मुख्यमंत्री नायब सैनी यांनी सोनीपत जिल्हा न्यायालयात केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
केजरीवाल यांचं विधान भ्रम निर्माण करणारे - यासंसंदर्भात हरियाणाचे महसूल तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विपुल गोयल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "अरविंद केजरीवाल यांचे विधान हास्यास्पद आणि भ्रम निर्माण करणारे आहे. हरियाणावर असे आरोप करून केजरीवाल यांनी अत्यंत हीन दर्जाचे राजकारण केले आहे. यासंदर्भात हरियाणा सरकारने कायदेशीर कारवाई केली आहे. दिल्लीला जे पाणी पुरवले जाते तेच पाणी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री देखील पितात. हे विधान करून केजरीवाल यांनी केवळ दिल्लीतील लोकांमध्येच नव्हे तर हरियाणातील लोकांमध्येही भीती पसरवण्याचे काम केले आहे.
अशी आहे शिक्षेची तरतूद -आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मध्ये अस्तित्वात आला होता, मात्र, केंद्र सरकारने १ ऑगस्ट २०२४ रोजी लोकसभेत आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक, २०२४ सादर करून तो मंजूर केला. आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत खोटी माहिती देणाऱ्या किंवा अफवा पसरवणाऱ्यांना एक ते दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. यासोबतच दंड अथवा शिक्षा आणि दंड दोन्ही एकत्रित देण्याची तरतूद करण्यात आली आहे.