यूपीएससीची परीक्षा देताना फसवणूक करून आरक्षणाचा लाभ घेतल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेली प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकर हिला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच तपासात सहकार्य करण्याचे आदेशही तिला दिले आहेत.
पूजा खेडकर हिच्यावर यूपीएससीची परीक्षा देताना फसवणूक केल्याचा तसेच ओबीसी आरक्षण आणि दिव्यांग कोट्यातील आरक्षणाचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने पूजा खेडकर हिला या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी सुनावणी करताना कोर्टाने म्हटले की, पूजा खेडकर हिने कुठला गंभीर गुन्हा केला आहे? ती अमली पदार्थांचा व्यापार करणारी माफिका किंवा दहशतवादी नाही आहे. तिने कुणाची हत्या केलेली नाही. ती एनडीपीएसचा गुन्हा केलेला नाही. तिने सारं काही गमावलेलं आहे. तसेच तिला आता कुठेही नोकरी मिळणार नाही. त्यामुळे या प्रकरणातील एकूण परिस्थिती पाहता दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्तीला जामीन दिला पाहिजे, असे कोर्टाने म्हटले.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी पूजा खेडकर हिला जामीन देण्यास विरोध केला. पूजा खेडकर ही तपासानमध्ये सहकार्य करत नाही. तसेच तिच्याविरोधातील आरोप हे गंभीर आहेत, असे सांगितले. दरम्यान, पूजा खेडकर हिच्यावर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी २०२२ मध्ये यूपीएससीच्या परीक्षेसाठी अर्ज करताना अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. मात्र पूजा खेडकर हिने तिच्यावरील आरोप फेटाळले आहेत.