नवी दिल्ली : मानवी तस्करीसाठी नेण्यात येणाऱ्या ९७५ बालकांची सुटका करण्यात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाला रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे यश आले आहे. या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांकडे पाठपुरावाही केला जात आहे. दिल्ली, केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकांवर ही कारवाई मागील साडेतीन वर्षांत झाली. यंदाच्या मार्च महिन्यात दिल्ली रेल्वेस्थानकावर ४४५ बालकांची सुटका केल्याने हा विषय पुन्हा प्रकाशात आला. २०११ पासून आतापर्यंत ९० घटनांमध्ये एकट्या दिल्ली पोलिसांना ४४५ बालकांना वाचविण्यात यश आले व २९० आरोपींना अटक करण्यात आली. दिल्ली रेल्वेस्थानकात झालेल्या बचाव अभियानातून मानवी तस्करीसाठी नेण्यात येणाऱ्या बालकांना वाचविण्यात पोलिसांना यश आले होते. त्यावरून देशभरात बालके याकामी नेणाऱ्यांच्या टोळ््या किती आहेत, पोलीस व राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने कोणती पावले उचलली, या खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला गृहराज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी उत्तर दिले. चौधरी म्हणाले, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे साडेतीन वर्षांत ६४ तक्रारी दाखल झाल्या असून ५५ प्रकरणांच्या सुनावण्या झाल्या आहेत. नऊ प्रकरणांच्या सुनावण्या सुरू आहेत. झारखंड, बिहार, प. बंगाल व केरळात मानवी तस्करीसाठी या बालकांचा वापर होणार होता. आयोगाने केलेले प्रयत्न व पोलिसांचे अभियान याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. (विशेष प्रतिनिधी)
९७५ बालकांची तस्करांच्या तावडीतून सुटका
By admin | Updated: December 4, 2014 00:47 IST