नवी दिल्ली : मेक इन इंडियाच्या नावाखाली केवळ असेम्ब्लिंग म्हणजेच वस्तूचे सुटे भाग जोडण्याचे काम सुरू असून वस्तू निर्मिती केली जात नसल्याचा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते म्हणाले की, भारत वस्तू उत्पादनात आत्मनिर्भर होत नाही, तोपर्यंत रोजगार, विकास आणि मेक इन इंडियासारख्या गोष्टी केवळ भाषणांतच राहतील.
राहुल गांधी यांनी ग्रेटर नोएडातील एका टीव्ही फॅक्टरीला भेट देत त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट केला. भारतात तयार होणाऱ्या बहुतांश टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात. आपण त्याचे केवळ जोडकाम करतो, उत्पादन नाही. हेच आयफोनपासून टीव्हीपर्यंतच्या इतर वस्तूंनाही लागू आहे, असे त्यांनी यात लिहिले.
देशातील लघुउद्योजक वस्तू तयार करू इच्छितात. पण सरकारकडे यासाठी धोरण आणि पाठबळ नाही. उलट त्यांच्यावर करांचे ओझे टाकले जाते आणि निवडक बड्या कंपन्यांना प्राधान्य दिले जाते, असे राहुल गांधी म्हणाले.