दिल्ली - ४ रुग्णवाहिकेतून १० मृतदेह मुस्तफाबादच्या गल्लीत आणले गेले. त्यात ३ मुलांचा समावेश होता. स्थानिकांच्या गर्दीत या रुग्णवाहिका वाट काढत पोहचल्या तेव्हा त्यातील मृतदेह बाहेर काढतानाच सगळ्यांचे डोळे पाणावले. घर मालक तहसीन यांचा मृतदेह सर्वात आधी बाहेर काढला. त्यानंतर त्यांचा मुलगा नाजिम, २ सून चांदणी व शाहीन, नातू अनस, आफरीन यांच्यासह भाडेकरू नावेद, रेश्मा यांचाही मृतदेह आणण्यात आले. या मृतदेहांच्या अंत्ययात्रेत २ हजार लोकांनी गर्दी केली होती.
दुर्घटनेत वाचलेल्या तहसीन यांचा मुलगा चांद हा धायमोकलून रडत होता. तहसीन यांच्या कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबात आता पत्नी जीनत, मुलगा चांद, मोठी सून आणि ५ नातवंडे आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतदेहांचे पोस्टमोर्टम जीटीबी रुग्णालयात करण्यात आले. कुटुंबाचे सर्वकाही उद्ध्वस्त झाले अशावेळी हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णवाहिकेची सोय तुम्हीच करा असं नातेवाईकांना सांगितले. मृतदेह घेऊन जाण्यासाठीही कुटुंबाकडे पैसे नव्हते. प्रशासनाकडून रुग्णवाहिकेची सोय न झाल्याने लोकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
नेमकं काय घडलं?
दिल्लीच्या मुस्तफाबाद येथे इमारत कोसळल्याने आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ४ मजली रहिवासी इमारत अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली. ज्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले गेले. काही लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
दरम्यान, दिल्लीतील मुस्तफाबादच्या या घटनेमुळे दिल्ली महापालिका जागी झाली आहे. महापालिकेकडून दाट लोकसंख्या असलेल्या परिसरातील इमारतींचा सर्व्हे केला जात आहे. बेकायदेशीर बांधकामे ओळखून ती पाडली जाणार आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दाट लोकवस्तीतील इमारतींच्या ढाच्याची पाहणी करण्यात येणार असून ज्या इमारती धोकादायक आहेत त्यांना खाली करण्यात येणार आहे. ज्या परिसरात ही इमारत दुर्घटना घडली तिथल्या अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे तर अन्य ३ अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.