नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या सेवेतील अराजपत्रित कर्मचा-यांना यंदाच्या वर्षासाठी ७८ दिवसांच्या पगाराएवढी रक्कम उत्पादकतेशी निगडित बोनस म्हणून देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. बोनसचे वितरण दस-यापूर्वी होईल.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, खरे तर रेल्वे कर्मचा-यांना उत्पादकतेशी निगडित बोनस देण्याचे जे सूत्र ठरले आहे त्यानुसार सन २०१६-१७ या वर्षासाठी ७२ दिवसांच्या पगाराएवढा बोनस देय ठरतो. परंतु ७८ दिवसांचा बोनस देण्याची सहा वर्षांपासून प्रथा आहे. त्यामुळे यंदाही रेल्वे कर्मचा-यांना तेवढाच बोनस देण्यास मंजुरी दिली गेली.सुमारे १२.३० लाख रेल्वे कर्मचाºयांना या निर्णयाचा लाभ होईल. बोनसपोटी रेल्वेवर २,२४५ कोटी ४५ लाख रुपयांचा बोजा पडेल. बोनसचा हिशेब करण्यासाठी दरमहा कमान सात हजार रुपये पगार गृहित धरला जाईल. त्यानुसार जास्तीत जास्त १७ हजार ९५१ रुपये बोनस मिळू शकेल. या बोनसमुळे रेल्वे कर्मचारी प्रोत्साहित होतील व त्यांच्याकडून सुरक्षित, जलद आणि वक्तशीर रेल्वे सेवा दिली जाईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.>रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) व रेल्वे विशेष सुरक्षा दलाच्या कर्मचाºयांना हा बोनस मिळणार नाही, असे एका पत्रकात स्पष्ट करण्यात आले.
१२ लाख रेल्वे कर्मचा-यांना यंदाही ७८ दिवसांचा बोनस, आरपीएफला लाभ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 04:09 IST