गंगटोक - अतिवृष्टी व भूस्खलनामुळे चातेनचा संपर्क तुटल्याने या भागात अडकलेल्या किमान ७६ सुरक्षा जवानांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. जवानांची सुटका केल्यानंतर भूस्खलनग्रस्त भागातील स्थानिक नागरिक व सैन्य कर्मचाऱ्यांसाठी हेलिकॉप्टरने १,३०० किलो मदत साहित्य पाठविण्यात आले.
जवानांना बाहेर काढल्यानंतर संयुक्तरीत्या सुरू केलेले अभियान शनिवारी थांबविण्यात आले. एमआय-१७ या हेलिकॉप्टरच्या मदतीने ७६ सुरक्षा जवानांना चातेन येथून पाकयोंग ग्रीनफील्ड विमानतळावर सोडण्यात आले. अतिवृष्टी व भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. नुकत्याच झालेल्या भूस्खलनामुळे उत्तर सिक्कीमसोबतचा संपर्क तुटला होता. यामुळे लाचेन, लाचुंग व चुंगथांग क्षेत्रात १,६००पेक्षा अधिक पर्यटक अनेक दिवस अडकून पडले होते. त्यानंतर सरकारने बचाव अभियान सुरू करत या सर्व पर्यटकांची सुटका केली.