लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: छत्रपती संभाजीनगर ते परभणीदरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, नागपूर ते इटारसीदरम्यान चौथ्या रेल्वेमार्गाची उभारणी यांसह ११,१६९ कोटी रुपये खर्चाच्या चार रेल्वे प्रकल्पांना आर्थिक व्यवहारांसंदर्भातील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने गुरुवारी मंजुरी दिली. या प्रकल्पांचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा, झारखंड या सहा राज्यांतील १३ जिल्ह्यांना फायदा होणार आहे.
यामुळे रेल्वेचे जाळे आणखी ५७४ किमीने वाढणार आहे. इटारसी ते नागपूर या चौथ्या रेल्वेमार्गासाठी ५,४५१ कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी २,१७९ कोटी रुपये, अलुआबारी रोड ते न्यू जलपाईगुडी रेल्वे मार्गासाठी १,७८६ कोटी रुपये आणि डांगोआपोसी-करौली रेल्वे मार्गासाठी १,७५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.