केरळमध्ये ब्रेन इन्फेक्शनशी संबंधित आजार असलेल्या अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटीसने ग्रस्त असलेल्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. या वर्षी राज्यात या आजारामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटीसने ग्रस्त रतीश (४५) हे वायनाड जिल्ह्यातील बाथेरीचे रहिवासी होते, एका आठवड्यापेक्षा जास्त काळ कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (केएमसीएच) मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे या रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली.
रतीश यांना खूप ताप आणि खोकला असल्याने त्यांना त्यांच्या घराजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यानंतर त्यांना केएमसीएच येथे रेफर करण्यात आलं, जिथे त्यांचा मृत्यू झाला. केएमसीएचमध्ये दाखल झालेल्या कासारगोड जिल्ह्यातील आणखी एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे, तर ११ जणांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
केरळमध्ये यावर्षी आतापर्यंत अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटीसचे ४२ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी बहुतेक कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांमधून नोंदवले गेले आहेत. या वर्षी या आजारामुळे एकट्या कोझिकोडमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये गेल्या महिन्यात तीन महिन्यांचं बाळ आणि नऊ वर्षांची मुलगी यांचा समावेश आहे.
अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटीस म्हणजे काय?
अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटीस हे एक दुर्मिळ परंतु अत्यंत धोकादायक ब्रेन इन्फेक्शन आहे जे नेग्लेरिया फाउलेरी नावाच्या अमिबामुळे होतं. याला सामान्य भाषेत 'मेंदू खाणारा अमिबा' असंही म्हणतात.
दूषित पाण्याद्वारे प्रसार
दूषित पाण्यात पोहताना किंवा आंघोळ करताना हा अमिबा नाकातून शरीरात प्रवेश करतो. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात नेग्लेरिया फाउलेरी उबदार आणि गोड्या पाण्यात टिकून राहतो.
ब्रेन इन्फेक्शनच्या प्रकरणांमध्ये वाढ
ब्रेन इन्फेक्शनच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर आरोग्य प्राधिकरणाने कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांमधील तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाण्याची चाचणी वाढवली आहे.
केरळचे वनमंत्री ए.के. ससींद्रन यांच्याकडून मिळालेल्या निधीचा वापर अतिरिक्त चाचणी उपकरणं खरेदी करण्यासाठी केला जात आहे. केरळ सरकार राज्यभरातील विहिरी, पाण्याच्या टाक्या आणि सार्वजनिक जलकुंभ स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबवत आहे.