सीतापूर (उ.प्र.) : वायुदलाचे हेलिकॉप्टर शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या सीतापूर भागात कोसळून सात जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बरेलीहून एएलएच ध्रुव या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते.
सीतापूर जिल्ह्यातील मणिपूर्वा येथे हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याने पेट घेतला. त्यातील सर्व सातजण ठार झाले असावे, असे उपविभागीय दंडाधिकारी ए.के.श्रीवास्तव यांनी सांगितले.
या हेलिकॉप्टरची आग विझवण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले होते. हे हेलिकॉप्टर अलाहाबादला जात असताना ते कोसळले अशी माहिती सीतापूरचे जिल्हाधिकारी जे.पी.सिंग यांनी दिली. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक आणि सहवैमानिकासह सातजण होते. यापैकी कुणीही जीवित असण्याची शक्यता नाही, असे ते म्हणाले.
या हेलिकॉप्टरने 3 वाजून 53 मिनिटांनी बरेली येथून रवाना झाले होते. 4 वाजून 57 मिनिटांनी हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, सीतापूर येथील घटनास्थळी पथक पाठवले आहे. (वृत्तसंस्था)