बडोदा : गुजरातमधील एका गावात कोणत्याही निवडणुकीत मतदान न केल्यास मतदाराला चक्क 51 रुपयांचा दंड आकारण्यात येतो. तर राजकीय पक्षांच्या प्रचारालाही या गावामध्ये बंदी घालण्यात आली आहे. या बद्दल दोन्ही पक्षांना निम्मी निम्मी मते घालण्याची शक्कल या गावकऱ्यांनी शोधली आहे.
गुजरातमध्ये राजसमाधीयाला या नावाचे एक गाव आहे. या गावात कमालीची स्वच्छता केली जाते. हरदेव सिंह जडेजा हे जेव्हा सरपंच झाले होते, तेव्हापासून या गावामध्ये निवडणुकांचा प्रचार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याचे कारण गावकऱ्यांनी असे सांगितले की, प्रचारामुळे प्रदुषण होते. तसेच मतदानही सक्तीचे करण्यात आले आहे. मतदान न केल्यास त्या व्यक्तीला 51 रुपयांचा दंड भरावा लागतो. प्रचार करायलाच जर कोणी आला नाही, मग मत कोणाला देणार? तर यावरही गावकऱ्यांनी उपाय शोधून ठेवला आहे.
महत्वाचे म्हणजे या गावाने आपली एक आदर्श नियमावलीच जारी केली आहे. जातीयवादाला या गावात थारा नाही. 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी रिकामे बसायचे नाही. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, अशा काही नियमांबरोबरच काही चुका केल्यास दंडही आकारण्याच येतो. यापैकीच एक म्हणजे मतदान न केल्यास 51 रुपयांचा दंड. दंडाची रक्कम 51 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहे.