काही दिवसांपूर्वीच १५ हजार रुपयांचा पगार असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आढळली होती. आता एका आरटीओ अधिकाऱ्याकडे भरमसाठ संपत्ती सापडली आहे. शिवाय खात्यातही करोड रुपये आहेत. मुलीला शिक्षणासाठी ४०-५० लाखांची फी भरली आहे. एवढा पैसा कुठून आला, असा प्रश्न एका व्यक्तीला पडला होता. त्याने सरकारी यंत्रणांना याची गुप्त माहिती दिली आणि अखेर ओडिशा सरकारने या अधिकाऱ्याच्या ठिकाण्यांवर धाड टाकून ही संपत्ती जप्त केली आहे.
ओडिशाच्या बौध जिल्ह्याच मोटर वाहन निरीक्षक म्हणून गोलाप चंद्र हांसदा हा अधिकारी तैनात होता. एका गुप्त माहितीने त्याचे बिंग फोडले आहे. त्याच्याकडे टाकलेल्या छाप्यात त्याच्या नावावर ४४ प्लॉट, एक किलो सोने आणि दोन किलो चांदीसह बँक खात्यात सव्वा कोटी रुपये आढळून आले आहेत. एका गोपनीय तक्रारीवरून कारवाई करत, दक्षताा विभागाने हांसदा येथील सहा ठिकाणी छापे टाकले होते. या अधिकाऱ्याची सरकारी कागदपत्रे आणि प्रत्यक्ष पडताळणीतून समोर आलेले आकडे पाहून छापा टाकणारे अधिकारी थक्क झाले.
हांसदा आणि त्याच्या कुटुंबाच्या ताब्यातील एकूण ४४ भूखंड, एक किलो सोने, २.१२६ किलो चांदी आणि १.३४ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बँक ठेवी उघड झाल्या. एका डायरीत त्याच्या अन्य बेकायदेशीर मालमत्तांची नोंद होती, ती डायरी आणि २.३८ लाख रुपये रोख सापडले आहेत. मुलीचे शिक्षण पाहिले असता तिच्यासाठी किती खर्च केला याचाही शोध घेण्यात आला आहे. मुलीच्या वैद्यकीय शिक्षणावर ४० लाख रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे.
हांसदा हा १९९१ मध्ये सरकारी नोकरीला लागला होता. त्याचा सध्याचा मासिक पगार हा मासिक पगार ₹१.०८ लाख आहे. वार्षिक उत्पन्न सुमारे ₹१३ लाख होते. एवढ्याशा पगारातून या अधिकाऱ्याने करोडोंची मालमत्ता कशी जमा केली, याचा तपास केला जात आहे.