'ते' 39 भारतीय अवैधरित्या इराकला गेले होते- व्ही. के. सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 08:54 AM2018-04-03T08:54:52+5:302018-04-03T08:54:52+5:30

39 भारतीय नागरिक ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून अवैधरित्या इराकमध्ये गेले होते, अशी माहिती व्ही. के. सिंग यांनी दिली.

39 indian killed had travelled illegally to Iraq says v k singh | 'ते' 39 भारतीय अवैधरित्या इराकला गेले होते- व्ही. के. सिंग

'ते' 39 भारतीय अवैधरित्या इराकला गेले होते- व्ही. के. सिंग

Next

आयसिस या दहशतवादी संघटनेकडून इराकमध्ये मारले गेलेले 39 भारतीय हे भारतातून अवैधरित्या आखाती देशात गेले होते. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी ही माहिती दिली आहे. इराकमधील मोसूल भागात 2014 मध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी 39 भारतीयांची हत्या केली होती. त्यांच्या मृतदेहांचे अवशेष काल (सोमवारी) भारतात आणण्यात आले. याबद्दल बोलताना हे सर्व भारतीय नागरिक ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून अवैधरित्या इराकमध्ये गेले होते, अशी माहिती व्ही. के. सिंग यांनी दिली. या नागरिकांची कोणतीही नोंद मध्य पूर्वेतील दूतावासाकडे नव्हती, असेही त्यांनी सांगितले.

इराकमध्ये मारल्या गेलेल्या 39 भारतीयांच्या मृतदेहांचे अवशेष आणण्यासाठी व्ही. के. सिंग इराकला गेले होते. या मृतदेहांचे अवशेष हवाई मार्गे भारतात आणण्यात आले. मारल्या गेलेल्या 39 पैकी एकाचे डीएनए  न जुळल्याने 38 जणांच्या मृतदेहांचे अवशेष भारतात आणले गेले. यापैकी 27 जण पंजाबचे, तर चार जण हिमाचल प्रदेशचे रहिवासी आहेत. उर्वरित सात जण हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे आहेत. इराकमध्ये मारल्या गेलेल्या 27 जणांच्या कुटुंबांना पंजाब सरकारने प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीही दिली जाणार आहे. 

ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून होणारा बेकायदेशीर प्रवास रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सिंह म्हणाले. मृतदेहांचे अवशेष भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारला इतका वेळ का लागला, असा प्रश्न सिंग यांना विचारण्यात आला. याबद्दल बोलताना, अजूनही इराकमधील युद्ध पूर्णपणे संपलेले नाही, असे उत्तर त्यांनी दिले.  'इराकमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धादरम्यान त्यांच्या सैन्याला मृतदेहांचे अवशेष गाडलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांचे केस मोठे होते. त्यावरुन ते पंजाबी असल्याची शक्यता निर्माण झाली. यावरुन पुढील तपास करण्यात आला आणि मृतदेहांच्या अवशेषांची ओळख पटली,' असे सिंग यांनी सांगितले. 
 

Web Title: 39 indian killed had travelled illegally to Iraq says v k singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.