सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू: जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत गुरुवारी तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. यात तीन जवान शहीद झाले. या परिसरात पाच अतिरेकी दडले असल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी शोधमोहिमेला वेग दिला. सान्याल जंगलात पलायन केलेला अतिरेक्यांचा हाच गट आहे की, नव्याने घुसखोरी झाली आहे, हे स्पष्ट झाले नाही.
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुपच्या नेतृत्वाखाली लष्कर, बीएसएफ व सीआरपीएफच्या मदतीने झालेल्या या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. दाट झाडांनी दडलेल्या ओढ्यालगत गोळीबाराच्या ठिकाणी तीन सुरक्षा कर्मचारी अडकल्याचे वृत्त आहे. मात्र, याला दुजोरा मिळाला नाही.
एरव्ही शांत असणाऱ्या गावात धावपळ
दिवसभर चकमक सुरू असल्यामुळे कठुआ जिल्ह्यातील एरव्ही शांत असलेले सुफेन गाव गोळीबार, ग्रेनेड व रॉकेटच्या सततच्या आवाजामुळे दणाणून गेले होते. यामुळे नागरिकांची धावपळ झाली. यापूर्वी रविवारी सायंकाळी पाकच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळील सान्याल गावात अतिरेक्यांच्या एका गटाला ढोक गावात रोखण्यात आले होते.