नवी दिल्ली : देशात दररोज मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होत आहे. शहरांमधून दररोज तब्बल तीन लाख टनांचा कचरा निर्माण होतो. यातील केवळ २० टक्केच कचऱ्याचे रिसायकलिंग करणे शक्य होते. सध्या कचरा रिसायकलिंगच्या उद्योगात वर्षाला ६० हजार कोटींची उलाढाल होत आहे. २०३० पर्यंत ही उलाढाल ३ लाख कोटींच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. सध्या १.२५ लाख कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह या उद्योगावर चालतो. येत्या सहा वर्षात ११ लाखू हून अधिक जणांना या उद्योगात रोजगार मिळू शकतात.
रिसायकलिंग उद्योगाशी संबंधित रिसस्टेनिबिलिटी लिमिटेड या कंपनीचे संचालक तसेच सीईओ मसूद मलिक यांनी सांगितले की, सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची निर्मिची होत असल्याने रिसायकलिंग उद्योगाचा विस्तार होण्यास भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
कामगारांचे आरोग्य जपण्याचे मोठे आव्हान
कचरा व्यवस्थापन उद्योग वेगाने विकसित होत आहे. यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाढत्या धोकादायक कचऱ्यामुळे मोठे आव्हान सध्या मानवजातीमसोर उभे राहिले आहे.
कचऱ्याची विल्हेवाट लावताना यात काम करणाऱ्यांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकाराचा धोका निर्माण होऊ नये यासाठीही काळजी घ्यावी लागणार आहे.
कचरा जमा करणे, त्याची शास्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे, प्रक्रिया करण्यायोग्य कचऱ्याचे विलगीकरण करणे याचे योग्य प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार आहे.
सरकारने राबवलेल्या स्वच्छता अभियानामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत कमालीची जागरूकता वाढली आहे. त्यांच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. बदललेल्या या मानसिकतेचा लाभ देशातील रीसायकलिंग उद्योगाला मोठ्या प्रमाणात झाला आहे.