नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक येत्या २१ मार्च रोजी, तर पंधरा पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींची निवड येत्या १४ मार्च रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची मुदत येत्या २० मार्च रोजी संपत आहे. तसेच जिल्ह्णातील पंधरा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची मुदत १३ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे जिल्ह्णातील सर्व पंधरा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीसाठी येत्या १४ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. जिल्ह्णात सर्वाधिक ६० पंचायत समिती सदस्य शिवसेनेकडून निवडून आले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ३२, तर भाजपाचे २७ सदस्य निवडून आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांची २० मार्च रोजी मुदत संपत असून, नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकारी पीठासन अधिकारी नियुक्त करतील. जिल्हा परिषदेत सर्वात जास्त सदस्य शिवसेनेचे २५ निवडून आले असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉँग्रेस - १८, भाजपा - १५, कॉँग्रेस - ०८, माकपा - ०३ व अपक्ष ०४ असे एकूण ७३ सदस्य निवडून आले आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बहुमत हे ३७ सदस्यांचे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत नेमक्या काय काय घडामोडी घडतील, त्यावरच ही अध्यक्ष व उपाध्यक्ष कोणत्या पक्षाचा होतो, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक २१ रोजी
By admin | Updated: February 28, 2017 02:30 IST