लोहोणेर/देवळा : देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथील अहेर वस्तीवरील मनोहर मेधने या युवकाचा देवळा - सटाणा राज्यमार्गालगत असणाऱ्या विहिरीत पडून मृत्यू झाला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने मेधने कुटुंबीयांत शोकमय वातावरण होते. मनोहरच्या मृत्यू प्रकरणी देवळा पोलिसांत दोन संशियतांंविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशियतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मनोहरचे वडील बापू काशीनाथ मेधने यांनी देवळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, संशयित सुनील (सोनू) अशोक अहेर, वैभव प्रभाकर अहेर (दोघेही, रा. सरस्वतीवाडी, ता.देवळा) यांनी मनोहर मेधनेचा पाठलाग केला. त्याची दुचाकी थांबवून त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेला मनोहर जीव वाचवण्यासाठी पळू लागला. पळताना पाय घसरून तो विहीरीत पडला त्यात त्याचा मृत्यू झाला. निरीक्षक सतीश माने याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साबळे पुढील तपास करीत आहेत. मनोहरच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. (वार्ताहर)
युवकाचा विहिरीत पडून मृत्यू
By admin | Updated: March 25, 2017 01:03 IST