नाशिक : अनेकांकडून लिखाणाचा आग्रह होतो. अनुभवांचे संचितही मोठे आहे; पण ते लिहिल्यास कौतुकापेक्षा समस्याच अधिक निर्माण होण्याची, आपल्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता आहे. आमच्याकडे आधीच समस्या भरपूर आहेत. त्यात आणखी भर नको. साहित्यिक प्रांताला टकलेंच्या रूपाने आमचा एक माणूस दिला, हे पुरेसे आहे. ‘ओली पाने’ ‘थोडी’च पुरेशी आहेत, ‘आणखी’ नकोत, अशा मिश्किल शब्दांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी टिप्पणी केली. निमित्त होते आमदार हेमंत टकले लिखित ‘थोडी ओली पाने’ पुस्तकाच्या प्रकाशनाचे. विश्वास लॉन्स येथे झालेल्या या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून पवार बोलत होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार तथा माजी मंत्री छगन भुजबळ, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, जयवंत जाधव, जि. प. अध्यक्षा विजयश्री चुंबळे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात पवार यांनी टकले यांच्या लेखनाचे कौतुक करताना अनेकांना टोले लगावले आणि मिश्किल टिप्पण्याही केल्या. टकले यांनी जुन्या आठवणी, प्रसंग, व्यक्तींविषयी उत्तम ललित लेखन केले आहे. राजकारणात यशवंतराव चव्हाण, ना. ग. गोरे यांच्या लेखनाची परंपरा आहे. टकले यांना कुसुमाग्रजांचा निकटचा सहवास लाभल्याचे त्यांच्या लिखाणात जाणवते. त्यांचे लेखन हवेहवेसे, वाचावेसे वाटणारे आहे; मात्र त्यांनी अर्ध्या, एका पानाचे लेख लिहिण्याऐवजी वाचकांना भरगच्च लेखनाची शिदोरी द्यावी, केवळ नैवेद्यावर थांबू नये. मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्याला लिखाणाची सूचना केली; मात्र लोकांचे ऐकणे व त्यावर बोलणे हे आमचे काम आहे. व्यक्तींवर लिहावे, स्थळावर लिहावे की अन्य कशाावर, हा प्रश्नच आहे. नाशिकमधील एक प्रसंग प्रकर्षाने आठवतो. तेव्हा ग्यानदेव देवरे हे नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. काकासाहेब वाघ हे त्यांच्या पाठीशी होते. तेव्हा मी २४-२५ वर्षे वयाचा होतो. देवरेंवर अविश्वास ठराव आणण्याचा पक्षाकडून आदेश होता. वाघ यांनी याला नकार देताच मी त्यांना ‘तुमच्यावर कारवाई करावी लागेल’ असे बजावले. त्यावर ‘तू काय कारवाई करशील? सदरा बदलावा तसा मी पक्ष बदलतो’ असे सणसणीत उत्तर दिले. हे असे प्रसंग लिहिता येतील का? त्यामुळे साहित्यिकांनी लिहावे आणि आम्ही वाचत राहावे. आम्ही लिहिलेले परवडणार नाही, असे पवार उद्गारताच हंशा पसरला. पवार यांनी टकले यांच्या पुस्तकांतील लेखांवरही भाष्य केले. कर्णिक, डॉ. पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. विश्वास ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. विनायकदादा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सई आपटे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. (प्रतिनिधी)
लेखन परवडणार नाही !
By admin | Updated: April 12, 2015 00:34 IST