सिन्नर : कंपनीत काम करताना सहकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांना योग्य मोबदला दिला जावा यावरून कामगार व कंपनी व्यवस्थापनात झालेल्या मतभेदानंतर त्याचे पर्यावसान तुफान दगडफेकीत झाले. १०० ते १५० कामगारांनी शापूरजी पालनजी कंपनीच्या कार्यालयावर हल्ला करीत तोडफोड केली. कामगारांना समजविण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनावर कामगारांनी तुफान दगडफेक केली. त्यात चार पोलीस जखमी झाले. गुळवंच शिवारातील सेझमध्ये रतन इंडिया कंपनीच्या कार्यक्षेत्रातील शापूरजी पालनजी कंपनीत उंचावरील चिमणीवर काम करीत असतांना त्यावरुन पडून मध्यप्रदेश राज्यातील लखन उदयभान आहेरबार (२३) या कामगाराचा सोमवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ४०० ते ५०० कामगार कंपनीच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडून होते. व्यवस्थापन व कामगारांमध्ये मृत कामगाराच्या वारसाला भरपाई देण्यावरुन चर्चेच्या फैरी सुरु होत्या. व्यवस्थापनाने पाच लाख रुपये देण्यास सहमती दर्शवली. मात्र कामगारांनी त्यापेक्षा जास्त रक्कम मिळण्याचा आग्रह धरला. त्याचवेळी १०० ते १५० कामगारांचा संतप्त जमाव कंपनीच्या कार्यालयावर चालून आला. त्यांनी दगडफेक करुन कार्यालयातील फर्निचर, संगणक व अन्य साहित्याची तोडफोड केली. कामगारांनी उग्ररुप धारण केल्याने अधिकारी व कर्मचारी जीव मुठीत धरुन पळाले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीही झाली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाची एकच धावपळ उडाली. कामगारांनी कंपनी आवारातील वाहने व इतर साहित्याची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने पोलीसवरही दगडफेक केली. घटनेचे गांभीर्य ओळखून सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश शिंगटे, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणजीत आंधळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची जादा कुमक घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिस्थिती आवाक्यात आली. याप्रकरणी कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक विनय वाटवे यांनी कंपनीच्या मालमत्तेचे सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस वाहनाचे नुकसान व पोलिसांवर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याची फिर्याद हवालदार चौधरी यांनी दिली.
दगडफेकीत चार पोलीस जखमीकंपनीच्या कार्यालवर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक कोल्हे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शासकीय वाहनासह कामगार वसाहतीकडे धाव घेतली. यावेळी कामगारांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात किशोर सानप, बालाजी सोमवंशी, प्रवीण मसोळे व सुनील जाधव हे चार कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर सिन्नर नगरपालिका रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे गुळवंच ग्रामस्थ व सिन्नरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्यात झालेल्या वादाची आठवण ताजी झाली.