दिंडोरी : नाशिक-कळवण रस्त्यावर दिंडोरीजवळील रनतळ परिसरात प्रवासी वाहतूक करणारी जीप व ट्रक यात झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून, नऊ जण जखमी झाले आहेत. वणीहून नाशिककडे येणारी काळी पिवळी (एम एच १५ सी २१७७) दिंडोरीजवळील रनतळ परिसरात आली असता समोरून भरधाव येणाऱ्या जीप-ट्रक (केए ०१ एइ ०६७६) यांच्यात अपघात होऊन त्यात जीपमधील सर्व प्रवासी जखमी झाले. त्यांना तत्काळ परिसरातील नागरिक, वाहनधारकांनी उपचारासाठी स्थानिक रुग्णालयासह जिल्हा रु ग्णालयात हलवले. त्यात चार महिलांची प्रकृती अत्यव्यस्थ होती. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला. भारती हनमंत ओहोळ (४०) असे त्या महिलेचे नाव असून, ती सामनगाव महाविद्यालय परिसर, नाशिकरोड येथील रहिवासी आहे. उर्वरित जखमींमध्ये चिंतामन महाले (४२) हे अत्यवस्थ असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.इतर तिघा जखमी महिलांची ओळख पटलेली नव्हती. त्यांची शुद्ध हरपल्याने त्यांची नावे रात्री उशिरापर्यंत कळू शकली नव्हती, तर इतर जखमींमध्ये महेश सांगळे (२६), पुष्पलता भोये (२२), निखिल भोये (८), खंडू गायकवाड (२५), अर्जुन अहिरे (५०) या जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दिंडोरी पोलिसांत याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अनोळखी स्त्रियांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (वार्ताहर)
दिंडोरीजवळ जीप-ट्रक अपघातात महिला ठार
By admin | Updated: July 21, 2015 00:24 IST