नाशिक : कॉलेजरोडला लागून असलेल्या येवलेकर मळ्याच्या परिसरातील एका पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी (दि.२९) बिबट्याच्या मुक्त संचाराची वार्ता शहरभर पसरली. बिबट्याने महिलेला जखमी केल्याची चर्चा सुरू होते. काही वेळेतच वनविभाग, पोलीस प्रशासनाचा लवाजमा या भागात दाखल होतो अन् बिबट्याचा शोध सर्वत्र घेतला जातो; मात्र सुर्यास्तापर्यंत या भागात कोठेही बिबट्या आढळून आला नाही. महिलेवर हल्ला झाला, पण बिबट्या कोणी नाही पाहिला, असेच वास्तव दिवस मावळतीला गेला असता समोर आले.बीवायके महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस बी-स्क्वेअर संकुलाच्या परिसरात बिबट्याचा संचार असल्याची वार्ता सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शहरभर पसरली. यामुळे नाशिक पश्चिम वनविभागाचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी हे रेस्क्यू पथकासोबत दाखल होतात. गंगापूर, सरकारवाडा पोलीस ठाण्यांचे पोलीसही वनविभागाला मदतीसाठी बंदोबस्ताकरिता तैनात केले जातात. कॉलेजरोड, विसेमळा, कृषीनगरकडून येणारी वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविली जाते. या भागात ध्वनिक्षेपकावरून पोलीसांकडून उद्घोषणा करत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या जातात. लॉकडाउन सुरू असल्यामुळे बघ्यांची फारशी गर्दी या ठिकाणी जमली नाही, त्यामुळे बिबट्याच्या शोधकार्यात फारसा अडथळा वनविभागाला जाणवला नाही. सातपूर, गंगाम्हाळुंगी, अंजनेरी अशा चारही वनपरिमंडळातील अतिरिक्त कुमक घटनास्थळी वनविभागाकडून बोलविण्यात आली. इको-एको वन्यजीवप्रेमी संस्थेचे स्वयंसेवकांनाही पाचारण करण्यात आले. उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनीही घटनास्थळी दाखल होऊन रेस्क्यू पथकाला बिबटचा शोध घेण्याबाबत विविध सुचना दिल्या. सर्वच वनपाल, वनरक्षक, वन्यजीवप्रेमींनी या भागातील गल्लीबोळ पिंजून काढत बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र कोठेही बिबट्याचे दर्शन घडले नाही. त्यामुळे बिबट्याने महिलेवर हल्ला केला तर लोकवस्तीत पुन्हा कोणालाही त्याचे दर्शन दिवसभरात घडले कसे नाही? असा प्रश्न कायम आहे.
महिलेवर हल्ला झाला, पण बिबट्या कोणी नाही पाहिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 19:59 IST
बिबट्याने महिलेवर हल्ला केला तर लोकवस्तीत पुन्हा कोणालाही त्याचे दर्शन दिवसभरात घडले कसे नाही? असा प्रश्न कायम आहे.
महिलेवर हल्ला झाला, पण बिबट्या कोणी नाही पाहिला
ठळक मुद्देगल्लीबोळ पिंजून बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न कोठेही बिबट्याचे दर्शन घडले नाहीजखमी महिलेने बिबट्या बघितला नसल्याचे सांगितले