सिडकोच्या भोळे मंगल कार्यालयाजवळील घटना सिडको : नात्यातील विवाह सोहळा आटोपून परिचयातील व्यक्तीच्या घरी पतीसोबत पायी जाणार्या महिलेच्या अंगावरील पाच तोळे वजनाची सोन्याची मंगळसूत्राची पोत मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी हिसकावून नेली़ रविवारी भरदुपारी सिडकोतील भोळे मंगल कार्यालयाजवळ घडलेल्या या घटनेमुळे महिलावर्गात भीती निर्माण झाली असून, चेनस्नॅचिंग करणारे टोळके पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे मालेगावजवळील सोयगावचे रहिवासी असलेले देवीदास शिंदे हे पत्नी प्रमिलासह नातेवाईकाच्या विवाहासाठी सिडकोतील भोळे मंगल कार्यालयात आले होते़ विवाह समारंभ आटोपल्यानंतर कामटवाड्यात राहणारे परिचित रोहन रुपवते यांना भेटण्यासाठी भोळे मंगल कार्यालयातून तीन वाजेच्या सुमारास पायी निघाले़ थोड्या अंतरावर गेले असता समोरून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने प्रमिला शिंदे यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढला़या घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ नाकेबंदी करून या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान, प्रमिला देवीदास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम़ एम़ गावित करीत आहेत़ (वार्ताहर)
महिलेचे पाच तोळ्याचे मंगळसूत्र खेचले
By admin | Updated: May 19, 2014 00:25 IST