आझादनगर : मालेगाव मनपाची मागील तहकूब व मासिक सर्वसाधारण महासभा बुधवारी (दि. १८) दुपारी साडेतीन वाजता मनपाच्या सभागृहात प्रथम दहा मिनिटांसाठी तहकूब करुन पुन्हा सुरू करण्यात आली. एका विषयास स्थगिती देत उर्वरित सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर मो. इब्राहीम मो. यासीन होते.दुपारी साडेतीन वाजता महासभेस राष्ट्रगीताने प्रारंभ झाला. पॅरिस येथे मृत्युमुखी पडलेले १२९ नागरिक, रा. स्व. संघाचे अशोक सिंगल, अभिनेता सईद जाफरी, स्थानिक मौलाना हुसेन अहमद मिल्ली यांना श्रद्धांजली वाहून १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. दहा मिनिटांंनंतर पुनश्च सभा सुरू झाली. तळवाडे साठवण तलावाची क्षमता वाढविण्यासाठी मनपाकडे असलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पूर्वानुभव नसल्याने हे काम पाटबंधारे विभागामार्फत करून घेण्यात यावे यासाठी विचारविनिमय करण्यासाठी हा विषय सभागृहासमोर ठेवण्यात आला. याची माहिती पाणीपुरवठा अभियंता जहीर अन्सारी देत असताना नगरसेवक असलम अन्सारी, एजाज उमर यांनी त्यास आक्षेप घेतला. मे २०१५ मध्ये या कामाच्या खर्चासाठी शासनाच्या हिश्श्याची पाच कोटी ८० लक्ष रुपये रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे पडून आहे. सहा महिन्यानंतर प्रशासनाला जाग आली. मनपाकडे सक्षम तांत्रिक कर्मचारी नसल्याचा आव आणून मनपाची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार घडवत आहेत. जनतेसमोर फक्त आव आणून हे काम पाटबंधारे विभागाकडे वर्ग करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. विस्तारीकरणाचे काम मनपा प्रथम करीत आहे असे नाही. यापूर्वीही नगरपालिकेने केले आहेत. शकील जानीबेग म्हणाले, मनपातर्फे २७५ कोटीची घरकुल योजना राबविण्यात येत आहे. अशा अनेक कोटीच्या योजना मनपा राबवित आहे. परंतु तळवाडे साठवण धरणाचे विस्तारीकरण करून साठवण क्षमता वाढविण्यासाठी सक्षम कर्मचारी नसल्याचे कारण पुढे करणे म्हणजे मनपाचा अपमान करणे होय.यावर वाढता आक्षेप पाहून महापौरांनी हा विषय २१ तारखेपर्यंत तहकूब केला. यानंतर ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम करणेकामी मनपाच्या हिश्श्याची रक्कम देण्याचा विषय महासभेपुढे ठेवण्यात आला. (वार्ताहर)
तलावाची क्षमता वाढविणार
By admin | Updated: November 19, 2015 21:51 IST