नशिक : शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कामकाजच करून घ्यायला हवे, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने हा निकाल देताना शिक्षण अधिकार अधिनियम २७चा हवाला दिला आहे. अशाप्रकारे शिक्षणेतर कामकाजापासून शिक्षकांची मुक्तता होण्यासाठी महाराष्ट्रातील विविध शिक्षण संघटनांनी वारंवार आंदोलने करून पाठपुरावाही केला आहे. परंतु त्यांना अद्यापही यश आलेले नाही. उलट दिवसेंदिवस शिक्षकांवरील शिक्षणेतर कामकाजाचा ताण वाढतच आहे.
शिक्षकांना यापूर्वी लोकसंख्या सर्वेक्षण, निवडणुकांसंबधी कामकाज तसेच विविध प्रकारचे गाव सर्वेक्षणाचे अहवाल तयार करण्याचे काम करावे लागत होते. त्यातच काही ठिकाणी शिक्षकांना पोषण आहार तयार करून विद्यार्थ्यांना वाटपही करावे लागत आहे. पूर्वी हे काम बचतगटांना देण्यात आले होते. मात्र, बचतगटांनीही पुरेशा मानधनाअभावी हे काम बंद केले आहे. त्यामुळे पोषण आहारातील खिचडी शिजविण्यापासून तिचे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे काम शिक्षकांनाच करावे लागत आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी पोषण आहाराचा निधी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचे कामही शिक्षकांनाच करावे लागत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा - ३२६६
एकूण शिक्षक - १२९१७
शिक्षकांची कामे
- खिचडी शिजवून घेणे व मुलांना वाटप करणे
- विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करणे
- शाळेची डागडुजी, रंगकाम करणे
- विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे
- मतदार नोंदणी व यादी पडताळणी
- आरोग्य सर्वेक्षण व जनगणना करणे
शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक
प्राथमिक शाळेत कारकून अथवा शिपाई पद उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षकांना इतर कामांसह वेगवेगळे अहवाल भरण्याचेही काम करावे लागते. शिक्षणेतर कामकाज करण्यात गुरफटलेल्या शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नसताना अशा अहवालांची पूर्तता करण्यासाठीच प्रत्येक शाळेत एक शिक्षक नियमित कार्यरत राहतो.
एक शिक्षकी शाळेचे हाल
एक शिक्षकी शाळेत शिकविण्यासह सर्वकामे एकाच शिक्षकाला करावी लागतात. शक्यतो वस्तिशाळांमध्ये अशाप्रकारे एकच शिक्षक कार्यरत असतो. त्याला संबंधित वस्तीच्या विविध सर्वेक्षणांसह मुलांना शिकविण्याचेही काम करावे लागते. त्यामुळे अशा शाळांचे आणखीनच हाल होताना दिसून येत आहेेत.
शिक्षक काय म्हणतात?
शिक्षकांना शिक्षणेतर कामकाज दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत रिणाम होतो. त्यामुळे शिक्षकांना केवळ शिकविण्याचे काम दिले पाहिजे. पोषण आहार, विविध सर्व्हे, बँक खाते उघडणे यासारख्या कामकाजासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे.
- सुभाष अहिरे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ,
--
शिक्षकांचे प्रमुख काम अध्यापनाचे आहे. परंतु, शिक्षकांवर अतिरिक्त कामकाजाच्या बोजामुळे अध्यापनाकडे शिक्षक लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. अशा कामकाजासाठी शासनाने स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.
- प्रवीण कांबळे, शिक्षक
शिक्षणेतर कामाचा ताण कमी व्हावा
शिक्षकांवरील शिक्षणेतर कामकाजाचा ताण कमी झाला तर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक अधिक कार्यक्षमतेने अध्यापन करू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीलाही मदत होईल. परंतु शासनाकडून वारंवार होणाऱ्या सूचनांमुळे शिक्षकांना गाव सर्वेक्षण, आरोग्यविषयक तसेच निवडणुकांविषयी वेगवेगळी कामे शिक्षकांनाही करावी लागतात. त्याला अधिकारी इच्छा असूनही थांबवू शकत नसल्याचे मत शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.