नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या उमेदवारीसाठी दोन लाख रुपये घेतल्याचा व्हिडिओ व्हॉयरल झाल्यानंतर पक्षाच्या आमदार तथा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हे दोन लाख रुपये निवडणूक खर्चात दाखविण्याचा दावा केवा होता, परंतु निवडणूक खर्च सादर करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतरही पश्चिम विभागातील भाजपाच्या एकाही उमेदवारांने दोन लाख रुपयांचा एकरकमी खर्च निवडणूक विभागाला सादर केलेला नाही. त्यामुळे भाजपाने उमेदवारांकडून सार्वजनिक खर्चासाठी घेतलेल्या प्रत्येकी दोन लाख रुपयांचे काय झाले? असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडला आहे. महापालिका निवडणूक विभागाने सर्व उमेदवारांनी प्रचारासाठी व निवडणूक कारणांसाठी केलेला खर्च शुक्रवार (दि.२४) पर्यंत लेखा विभागात सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधित पश्चिम विभागातून भाजपाकडून उमेदवारी करणाऱ्या एकाही उमेदवाराने एकरकमी दोन लाख रुपयांचा खर्च सादर केलेला नाही. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक ७ ब मधील उमेदवार हिमगौरी आडके (३ लाख ५६ हजार ५५४ रुपये), २४ ड मधील राम पाटील(२ लाख १ हजार १९०) व २४ ब मधील जगन्नाथ पाटील (२ लाख ७३ हजार ७१५) या उमेदवारांशिवाय कोणीही दोन लाख रुपयांचा खर्चही सादर केलेला नाही. भाजपाकडून नरेंद्र पवार यांनी अवघा १ लाख ५६ हजार ३८१ रुपये खर्च सादर केला असून, स्वाती भामरे यांनी १ लाख ४० हजार ५१८ रुपये, योगेश हिरे यांनी १ लाख ६२ हजार ४२६ रुपये, प्रियंका घाटे यांनी १ लाख ५० हजार ९४५ रुपये, हेमंत धात्रक यांनी १ लाख ८७ हजार ७८२ रुपये, प्रेरणा बेळे यांनी १ लाख ७७ हजार २४० रुपये शिवाजी गांगुर्डे यांनी १ लाख ५६ हजार ५७ रुपये, सुनंदा गिते यांनी केवळ ६९ हजार ४६८ रुपये, सुरेखा नेरकर यांनी ५७ हजार ८०१ रुपये खर्च सादर केला आहे.
‘त्या’ दोन लाख रुपयांचे काय झाले?
By admin | Updated: February 25, 2017 00:53 IST