मालेगाव - शरद पवार हे केंद्रात दहा वर्षे कृषिमंत्री होते; परंतु त्यांनी तेव्हा शेतकऱ्यांसह सहकारासाठी काय केले, याचा हिशेब त्यांनी द्यावा, असे आव्हान देत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. केवळ मार्केटींग करून नेता बनणे हा पर्याय नाही तर जमिनीवर राहून काम करावे लागते, असा सल्ला देखील त्यांनी पवार यांना दिला.
मालेगाव तालुक्यातील अजंग येथे शुक्रवारी (दि. २४) व्यंकटेश्वरा को-ऑप. पॉवर ॲण्ड ॲग्रो प्रोसिसिंगच्या माध्यमातून आयोजित सहकार परिषदेत शाह बोलत होते. यावेळी शाह यांनी आगामी काळात मृदा परीक्षण करणाऱ्या संस्थांना मदत केली जाईल. सेंद्रिय शेती आणि या शेतीतून मिळालेल्या उत्पादनांच्या प्रमाणीकरणासाठी केंद्रीय सहकार विभागाच्या माध्यमातून संस्थांची निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रासायनिक खतांचा वाढता वापर पाहता प्रयोगशाळांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बेळगाव येथील काजू उद्योगाचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.
शाह त्र्यंबकराजासह निवृत्तिनाथांच्या चरणीअमित शाह यांनी त्र्यंबकेश्वर येथे सपत्नीक ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले व धार्मिक पूजाविधी, आरती केली. तसेच शनिवारी (दि. २५) संत निवृत्तिनाथ महाराज यांची यात्रा असल्याने संत निवृत्तिनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दौऱ्यामुळे सकाळपासूनच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.