\नाशिक : शहराला करण्यात आलेली पाणीकपात रद्द करण्याची घोषणा स्थायी समितीचे सभापती राहुल ढिकले यांनी केली असली तरी प्रत्यक्षात मात्र ती रद्द होऊच शकली नाही. पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना कोणत्याही सूचना नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार आणि महापौर अॅड. यतिन वाघ सोमवारी (दि.४) निर्णय घेणार आहेत.सिडको आणि सातपूर या दोन विभागांत एकवेळ पाणीपुरवठा केला जातो; परंतु त्याचबरोबर पूर्व,पश्चिम, पंचवटी आणि नाशिकरोड विभागातदेखील एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला. त्या माध्यमातून १५ टक्केपाणीकपात करण्यात आल्याचा प्रशासनाचा दावा होता. दरम्यान, गेल्या आठवडाभरात शहरात जोरदार पाऊस झाल्याने महापौर अॅड. यतिन वाघ यांनी दोन दिवसांत निर्णय घेऊ असे जाहीर केले होते; परंतु त्यावर कडी करीत शुक्रवारी (दि.१) स्थायी समिती सभापती राहुल ढिकले, गटनेता अशोक सातभाई यांच्यासह अन्य नगरसेवकांनी महापौरांना टाळून आयुक्तडॉ. संजीव कुमार यांची भेट घेतली आणि पाणीकपात रद्द करण्याची मागणी करण्यात आली. आयुक्तांनी ती मान्य केल्यानंतर सभापतींनी शनिवारपासून पाणीकपात रद्द करण्यात येईल, तथापि, पाणीपुरवठा एकवेळच होईल, असे जाहीर केले होते; परंतु याबाबत महापौर अॅड. वाघ आणि पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी शनिवारी (दि.२) महापौरांची भेट घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले होते. दरम्यान, शनिवारी महापौरांच्या व्यस्ततेमुळे निर्णय होऊ शकला नाही आता सोमवारी (दि. ४) बैठक घेऊ असे महापौर आणि अधीक्षक अभियंता पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)