नाशिक : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या भाविकांना शहरात आणणाऱ्या बसेससाठी शहराबाहेर उभारण्यात येणार असलेल्या थांब्यांसाठी प्रशासनाने परिवहन महामंडळाला अद्याप जागाच दिल्या नसल्याने हे थांबे उभारायचे कोठे, असा प्रश्न परिवहन विभागाला पडला आहे. सिंहस्थासाठी लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होत असतात. पर्वणी काळात शहरात खासगी वाहनांना प्रवेश नसल्याने त्या भाविकांना बाहेरून शहरात आणण्याचे काम महामंडळाच्या बसेसद्वारे केले जाते. त्यासाठी शहराबाहेर प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी बसथांबा उभारला जातो. शहराला जोडणाऱ्या किमान दहा महत्त्वाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे थांबे उभारले जातात. त्यासाठी प्रशासनाकडून ठरावीक जागा काही कालावधीच्या आत महामंडळाला सुपूर्द केल्या जातात. त्यानंतर महामंडळ त्या जागी दुरुस्ती करून तेथे शेड उभारते आणि प्रवाशांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी बांधकामही करते. त्यासाठी जागा मिळाल्यानंतर किमान काही महिने काम चालते. परंतु यंदा सिंहस्थाला केवळ एक वर्षाचाच अवधी बाकी असताना, त्याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने महामंडळासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मर्यादित वेळेत जर जागा दिल्या तर त्यावर होणाऱ्या कामासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही आणि त्याचा फटका प्रवाशांच्या वाहतुकीला बसेल. त्यामुळे अशा जागा निश्चित करून त्या त्वरित महामंडळाला सुपूर्द कराव्यात, अशी मागणी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
जागेच्या प्रतीक्षेत परिवहन महामंडळ
By admin | Updated: July 19, 2014 01:05 IST