टमाटे तोडणी, वाहतुकीचा खर्चही विक्रीतून निघत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून टमाटे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ्रअनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर वा जनावरांपुढे टमाटे टाकून देत या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. वाघाळे येथील शेतकरी समाधान बाळनाथ सोमासे यांनी अर्धा एकर टमाटे पीक घेतले होते. सध्या बाजारात टमाटे पिकाला मिळत असलेल्या मातीमोल दरामुळे तोडणी व बाजारात नेण्याचा खर्च वाचेल याचा विचार करत सोमासे यांनी टमाटे पीकच उपटून फेकले.
टमाटे पिकासाठी घरची मजुरी वगळता सुमारे साठ हजार रुपये खर्च आला होता. पीक विक्रीसाठी तयार झाले, तर बाजारात भाव नाही. तोडणी व वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने पीक उपटून टाकण्याची वेळ आल्याचे सोमासे यांनी सांगितले. शासनाने टमाटे उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना अर्थिक मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.