सिन्नर : वडगाव - सिन्नर येथील ३२ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २४ जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यांच्यापैकी १९ जणांना मंगळवारी रात्री उशिरा आगासखिंड येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह काकाच्या संपर्कात आलेल्या पाच वर्षाच्या पुतणीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिच्या कुटुंबीयांची चिंता मात्र वाढली आहे. तिच्यावर आई-वडिलांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे या दोघांना रुग्णालयातच क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. इतर तीन सदस्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे तर उर्वरित १९ व्यक्तींना आगासखिंड येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली.दरम्यान, सिन्नर शहरातील वाजे लॉन्सजवळील एका ८६ वर्षीय वृद्धाची कोरोना चाचणी बाधित आल्याने त्यांच्याही जवळच्या संपर्कातील २७ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्या सर्वांना आरोग्य विभागाने होम क्वॉरण्टाइन केले आहे. यापैकी एका ३० वर्षीय डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, एका अहवालाची प्रतीक्षा आहे.
वडगाव - सिन्नरचे १९ जण विलगीकरण कक्षात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:48 IST