विहितगाव येथील मरीमाता मंदिरासमोर सुंदराई निवाससमोर एक इनोव्हा कार (एमएच १५ एके १०८६) येऊन थांबली. त्यामधून संशयित प्रशांत बागूल (रा. बागूलनगर), विक्रम गवळी (रा. विहितगाव), राहुल बनकर (रा. बागूलनगर), विकी हांडोरे (रा. प्राइड सोसायटी) हे चौघे उतरले. त्यांनी विक्रम कोठुळे यांच्या घरावर दगडफेक केली आणि फिर्यादी कोठुळे यांच्या नावाने शिवीगाळ करत निघून गेले. थोड्या वेळाने कोठुळे घराबाहेर आले असता पुन्हा चौघा संशयितांनी कारमधून येत हातात कोयते घेऊन बंगल्याचे गेट उघडून दहशत माजवत काही जण घरात शिरले. विक्रम यांच्या आई व पत्नीला संशयितांनी बाहेर काढले. संशयितांनी कोठुळे यांच्या घरावर दगड फेकून दहशत माजवली. कोठुळे यांनी उपनगर पोलिसांना फोनवर घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात कोठुळे यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विहितगावात कोयत्यांनी धमकावून घरावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST