नाशिक : शिंदेगाव येथील टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या एका लोखंडी बारमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टोलनाक्यावर पुरेशी सुरक्षितता न बाळगल्याने अनेकदा अपघात झाल्याचा आरोप करीत वाहनांच्या मालकांनी नाक्याच्या व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विनोद शिरभाते यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जानुसार ते सिन्नरकडून नाशिककडे येत असताना शिंदे टोलनाक्यावर आले. त्यांनी रिटर्न टोलची पावती घेतली असल्याने ज्या लेनमध्ये थांबण्याची गरज नाही अशा लेनमधून त्यांची मोटार पुढे गेली आणि त्याचवेळी लेनमध्येच मोठा लोखंडी दांडा असल्याने त्याला मोटार धडकली. त्यामुळे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. सदर लेन बंद असली तर तसा कोणताही फलक दर्शनी भागात लावण्यात आला नव्हता. तसेच लोखंडी बारवर रिफ्लेक्टर लावण्यात आला नसल्याने अपघात घडला त्यामुळे भविष्यात अशाप्रकारचे अपघात टाळण्यासाठी संबंधित टोल नाक्याच्या व्यवस्थापकांवर कारवाई करावी आणि त्यांना ताकीद द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिंदेगाव येथील टोल नाक्यावर लोखंडी बारमुळे वाहनांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:07 IST