नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत गुरुवार, दि. १६ ते बुधवार दि. २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या जलजागृती सप्ताहाच्या माध्यमातून समाजात जलसाक्षरता, जागृती निर्माण करून राज्यातील सिंचन कार्यक्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट शासनामार्फत ठेवण्यात आले आहे. राज्यात पाणीसंबंधित कार्यरत असलेल्या कृषी, पाणीपुरवठा, उद्योग, पर्यावरण, ग्रामविकास, नगर विकास आदि विभागांमार्फत जलजागृती सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. हा जलजागृती सप्ताह जनसामान्यांपर्यंत रुजावा तसेच यामध्ये सर्वांचा सहभाग असावा, यासाठी सर्वांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन जलसंपदा विभाग, नाशिक यांच्यामार्फत करण्यात आले आहे. ‘पाणी’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून कथा, कविता, एकपात्री प्रयोग, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य आणि चित्रकला अशा विविध स्पर्धांचे विनामूल्य आयोजन क रण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धा शुक्रवार दि. १७ मार्च रोजी होणार असून सकाळी अकरा ते दोन आणि दुपारी तीन ते पाच या दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला पाच मिनिटांचा अवधी देण्यात येणार असून ‘जलसाक्षरता’, ‘पाणी प्रश्न आणि मी’, ‘पाणी काल, आज आणि उद्या’ या तीन विषयांवर सादरीकरण करायचे आहे. पथनाट्य तसेच एकपात्री प्रयोग स्पर्धा शनिवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली असून, स्पर्धकांकडून स्वतंत्र प्रयोग सादर होणे आवश्यक आहे. जलजागृती सप्ताहांतर्गत होणाऱ्या स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन तसेच खुल्या गटात होणार असून, या स्पर्धेसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही, तसेच स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रुपये एक हजार, रुपये सातशे पन्नास, रुपये पाचशे रोख तसेच सहभाग प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या सप्ताहांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा पुढे नमूद करण्यात आलेल्या पत्त्यावर नियोजित वेळेप्रमाणे होणार आहे. स्पर्धकांनी आपले साहित्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक वाचनालय, सिंचन भवन, त्र्यंबकरोड, नाशिक या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जलजागृती सप्ताहांतर्गत विविध स्पर्धा
By admin | Updated: February 22, 2017 23:21 IST