युनिसेफने व्यक्त केला बालविवाह वाढण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST2021-09-02T04:30:41+5:302021-09-02T04:30:41+5:30

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालविवाह वाढण्याचा धोका लक्षात घेऊन असे प्रकार रोखण्यासाठी युनिसेफच्या माध्यमातून विशेष जनजागृती मोहीम ...

UNICEF warns of growing child marriage | युनिसेफने व्यक्त केला बालविवाह वाढण्याचा धोका

युनिसेफने व्यक्त केला बालविवाह वाढण्याचा धोका

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालविवाह वाढण्याचा धोका लक्षात घेऊन असे प्रकार रोखण्यासाठी युनिसेफच्या माध्यमातून विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत महिला व बालकल्याण विभाग सोशल मीडियाच्या माध्यमातून बालविवाहापासून वाचलेल्या मुलींच्या कथा सांगण्यासाठी तसेच पालकांच्या समुपदेशनासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती युनिसेफ महाराष्ट्राच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर यांनी दिली आहे.

कोरोनामुळे जगभरात सुमारे २५ लाख बालविवाह होण्याचा धाेका एका अभ्यासातून समोर आल्याचे नमूद करतानाच भारतातही बालविवाहांची संख्या वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे आर्थिक संकट तसेच पालकांचा मृत्यू आदी कारणांमुळे बालविवाह उरकून टाकले गेले. असे प्रकार सुरूच असून बालविवाहामुळे लैंगिक हिंसा, कौटुंबिक हिंसाचार आणि अल्पवयातील गर्भधारणेचा धोका संभवण्याची भीती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार बहुतांश जिल्ह्यांमध्ये बालविवाहांचे प्रमाण कमी झाले असले तरी राज्यात ५ पैकी एक बालविवाह होत असल्याचे नमूद करतानाच बालविवाहांविषयी महिला व बालविकास विभाग अथवा पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही राजेश्वरी चंद्रशेखर यांनी केले.

कोरोनात ७९० बालविवाह रोखले

कोरोना काळात महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून सुमारे ७९० बालविवाह रोखण्यात आले. यात सोलापूर- ८८, औरंगाबाद- ६६, उस्मानाबाद आणि नांदेडमध्ये प्रत्येकी- ४५, यवतमाळ आणि बीडमध्ये प्रत्येकी ४० विवाह थांबवण्यात आले. संबंधितांविरोधात कारवाई करण्यात आली असे युनिसेफकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: UNICEF warns of growing child marriage