नाशिक : नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला लागण्याचे आदेश शनिवारी स्वागताध्यक्षांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आलेले नोडल अधिकारी नितीन मुंडावरे यांनी संमेलन स्थळ, परिसर आणि उपलब्ध सोयीसुविधांची पाहणी करून विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
नाशिकचे संमेलन अधिक निर्विघ्न पार पडावे यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांची नेमणूक केली आहे. रविवारी पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर सर्वच विभागांना कामाला लागण्याचे, तसेच पुढील ५० दिवसांत सर्व कामे सज्ज कऱण्याचे आदेश देण्यात आले. त्यात वाहतूक व्यवस्था, पार्किंगसह, स्वच्छता, वीज, वायफाय, अग्निशमन आणि संबंधित सर्व यंत्रणा लवकरात लवकर तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंडावरे यांनी संमेलन स्थळाची पाहणी करण्यासाठी नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजीव बच्छाव, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कल्पना कुटे, आरोग्य विभागाचे प्रशांत शेटे, नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी संजय बैरागी, आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशांत वाघमारे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी संमेलनस्थळाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. कोणत्या ठिकाणी काय उपाययोजना करायच्या त्याची यादी तयार करून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. हे संमेलन नाशिककरांचे आहे, ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे होईल त्याची जबाबदारी प्रत्येकावर असल्याचे मुंडावरे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत लोकहितवादी मंडलाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, उपाध्यक्ष भगवान हिरे, कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सचिव सुभाष पाटील, संजय करंजकर, अमोल जोशी यांच्यासह अधिकारी कायर्कर्ते उपस्थित होते.