मालेगाव : सायजिंग उद्योगात इंधन म्हणून अवैधरित्या लाकुड वापरणाऱ्या स्थानिक पाच उद्योगांविरोधात येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाने गुन्हे दाखल केले आहेत. यंदाच्या वर्षीची ही अशाप्रकारची पहिली कारवाई आहे. यंत्रमागनगरी असलेल्या मालेगाव शहरात कापडउद्योगाचा भाग असलेला सायजिंग उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगात इंधन म्हणून प्लास्टीक कचऱ्याबरोबरच मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतो. त्यातही इंधन म्हणून वापर करण्यास बंदी असलेल्या लाकडाचा खुलेआम वापर होतो. त्यामुळे शहरातील प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. मात्र शासनाचा वन व पर्यावरण विभाग तथा प्रदुषण नियामक मंडळ यांच्यासह स्थानिक मनपा प्रशासनाने या उद्योगाच्या अवैध हरकतींकडे आतापर्यंत साफ दुर्लक्ष केले आहे. यापार्श्वभूमीवर काही पर्यावरणप्रेमींनी शासनाकडे सातत्याने तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत नाशिक वनविभागाच्या पथकाने मालेगावातील सायजिंग उद्योगाची पाहणी केली. त्यात शहरातील नवकिरण सायजिंग, सुमीत सायजिंग, जे. डी. सायजिंग, आर. झेड. सायजिंग व आराधना सायजिंग या पाच सायजिंगमध्ये अवैधरित्या लाकडाचा इंधन म्हणून वापर होत असल्याचे या पथकास आढळून आले. त्यात प्रामुख्याने इंधन म्हणून वापरण्यास बंदी घालण्यात आलेल्या कडुनिंबाच्या लाकडाचा वापर होत असल्याचे दिसनू आले. त्यामुळे सदर पथकाने या पाचही सायजिंगविरोधात मालेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे शहरातील सायजिंग उद्योगातील लाकडाचा वाढता वापरचा विषय पुन्हा चर्चेस आला आहे. याप्रकरणी वनखाते पुढे काय कारवाई करते याकडे शहरातील पर्यावरणप्रेमी व सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ंमालेगाव : इंधनासाठी अवैधरीत्या लाकडाचा वापर
By admin | Updated: July 17, 2015 00:02 IST