नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सर्वच राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली असतानाच पक्षीय स्तरावर नेत्यांच्या जाहीर सभांचेही नियोजन केले जात आहे. शिवसेनेने दि. १६ फेब्रुवारी रोजी जाहीर सभेसाठी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची मागणी केली आहे, तर मनसेने दि. १७ व १८ फेब्रुवारीला मैदानासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे उद्धव व राज ठाकरे यांच्या जाहीर सभा नाशिकला होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान हे सर्वात मोठे मैदान आहे. या मैदानाची क्षमता सुमारे ९५ हजार इतकी आहे. सदर मैदानावर जाहीर सभा घेण्याचे धारिष्ट्य आजवर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह कॉँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच दाखविले आहे. आता महापालिका निवडणुकीचे ढोल वाजण्यास सुरुवात झाल्यानंतर पक्षनेत्यांच्यही सभांचे नियोजन केले जात आहे. शिवसेनेने दि. १६ फेबु्रवारीला मैदान जाहीर सभेसाठी मागितले आहे. सेनेला मनपाने तशी परवानगीही दिल्याने उद्धव ठाकरे यांची सभा जवळपास निश्चित झाली आहे. तर मनसेने दि. १७ व १८ फेबु्रवारीला मैदान आरक्षित करण्यासाठी अर्ज दिला आहे. परंतु सर्व पक्षांना समान न्याय यानुसार मैदान दिले जाणार असल्याने महापालिकेने मनसेला कोणत्याही एकाच दिवशी मैदान उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मनसे कोणती तारीख निश्चित करते, याकडे लक्ष लागून आहे.
उद्धव, राज यांच्या होणार सभा
By admin | Updated: January 21, 2017 00:32 IST