मालेगाव : शहरातील खुद्दारनगर भागातील सहा महिन्यांच्या फैजान आबिद शेख या बालकाला झोळीतून अज्ञातांनी पळवून नेल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. खुद्दारनगर भागातील घर क्रमांक ७२ मध्ये पेंटर काम करणारे शेख आबीद शेख इस्माईल राहतात. यांचा सहा महिन्यांचा मुलगा फैजान याला त्याच्या आईने आंघोळ करून झोळीत टाकले होते. बालकाची आई कामानिमित्त बाहेर गेली असता अज्ञात अपहरणकर्त्यांनी फैजान याला पळवून नेले. या घटनेची माहिती मिळताच आईने व नातेवाइकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी बालकाच्या शोधासाठी तत्काळ पथके रवाना केली होती. सामाजिक कार्यकर्ते शफीक अॅण्टिकरप्शन यांनीही तरुणांच्या मदतीने बालकाचा शोध घेतला; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत बालकाचा शोध लागला नाही. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आपसातील वादामुळे अपहरणासारखा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व माहिती घेतली. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश सिरसाठ हे करीत आहेत. (प्रतिनिधी)
मालेगावी बालकाला पळविल्याचा प्रकार
By admin | Updated: October 23, 2016 00:32 IST