शैलेश कर्पे/ सिन्नर : आमच्या बार्जची हनमॅन प्लॅटफार्मवर टक्कर होऊन पाठीमागच्या बाजूस मोठे छिद्र पडले आणि बार्जमध्ये हळूहळू पाणी घुसू लागले. बार्जवरील रेडिओ ऑफिसमधून आम्हाला लाइफ जॅकेट व बाॅयलर सूट घालण्याचे सांगण्यात आले आणि आम्ही १० ते १५ जण मिळून एकमेकांचे हात पकडत समुद्रात झोकून दिले. प्रचंड प्रमाणात उसळणाऱ्या लाटा, सुरू असलेला जोरदार पाऊस अशा संकट काळात पाण्यात चार-पाच तास मृत्यूशी झुंज देत राहिलो. अखेर नाैदलाने आमची सुटका केली आणि आमचा पुनर्जन्मच झाला.... सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रूक येथील दोघा युवकांनी घरी सुखरूप परतल्यानंतर चक्रीवादळाच्या तडाख्याचा हा थरार ‘लोकमत’शी बोलताना कथन केला. तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने उधाणलेल्या समुद्रात पाच नौकांपैकी बार्ज पी-३०५ बुडाल्याने काहींना जीव गमवावा लागला तर काही जण बेपत्ता झाले. नौदलाला सुमारे पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना वाचविण्यात यश आले. त्यात सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रूक येथील विशाल तुकाराम केदार (२०) व अभिषेक नामदेव आव्हाड (१९) या दोघा मित्रांचा समावेश होता. हे दोघे युवक आपल्या घरी सुखरूप परतल्यानंतर त्यांनी खवळलेल्या समुद्रात अनुभवलेला थरार कथन केला. विशाल केदार याने सांगितले, आम्हाला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला होता; परंतु कॅप्टन व कंपनीने त्याचे गांभीर्य घेतले नाही. त्या वेळी बार्ज प्लॅटफाॅर्मपासून केवळ २०० मीटर अंतर मागे घेतले. तेथेच अँकरिंग केले. १५ मे रोजी वातावरण शांत होते. १६ तारखेला ११ वाजेनंतर पाऊस सुरू झाला. बार्जवर मोठमोठ्या लाटा येऊन आदळत होत्या. ३.३० वाजता बार्जचे अँकर तुटून ते वाहायला लागले व भरकटले. बार्जमध्ये पाणी घुसायला लागले तेव्हा आम्हा सर्वांना लाइफ जॅकेट घालण्यास सांगण्यात आले. या वेळी लाइफ बाेटीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. बार्जच्या कॅप्टनने नौदलाशी संपर्क साधल्यानंतर नौदलाचे जवान आमच्या सुटकेसाठी आले. आम्ही गटागटाने पाण्यात उड्या घेतल्या; परंतु नौदलाची बोट आमच्याजवळ येऊ शकत नव्हती. सुमारे चार ते पाच तास आम्ही पाण्यात संघर्ष करीत राहिलो. उसळणाऱ्या लाटांमध्ये आमचे काही सहकारी बेपत्ता झाले. परंतु मी नौदलाच्या हाती लागलो आणि माझा जीव वाचू शकला, अशा शब्दांत केदार याने आपला अनुभव सांगत पुनर्जन्मच झाल्याची भावना व्यक्त केली.जीवलग मित्रांनी साेडली नाही साथविशाल केदारे व अभिषेक आव्हाड दोघे जीवलग मित्र आहेत. विशाल केदारे (२०) हा अडीच महिन्यांपूर्वी तर अभिषेक आव्हाड (१९) हा दीड महिन्यापूर्वी मॅथ्यू असोसिएट कंपनीत कामाला लागला. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर लगेचच ते नोकरीला लागले. अभिषेक हा एकुलता एक आहे. दोघांच्या घरी एकत्रित कुटुंब व शेती व्यवसाय. जहाज बुडायला लागण्यापूर्वी दोघांनी लाइफ जॅकेट अंगात घालून एकमेकांचा हात हातात धरून रेक्स्यूसाठी समुद्रात उडी घेतली. एका भयानक संकटातून वाचल्याचे सांगताना दोघांनाही अश्रू अनावर झाले.दैव बलवत्तर म्हणून बचावलो-अभिषेकबार्जवर दोडी बुद्रूक येथीलच अभिषेक नामदेव आव्हाड हा युवकसुद्धा नुकताच दीड महिन्यापूर्वी रुजू झाला होता. अभिषेकनेही केवळ दैव बलवत्तर म्हणून आपण वाचल्याचे सांगितले. अभिषेक म्हणाला, बार्जवर २७० कर्मचारी होते. ज्या वेळी बार्ज बुडू लागली त्या वेळी आम्ही एकमेकांचे हात घट्ट पकडत समुद्रात उड्या घेतल्या. प्रचंड वारा, मोठ्या लाटा यामुळे आम्ही दूर फेकलो जात होतो. नौदलाचे जवान आमच्यापासून बऱ्याच लांब अंतरावर होते. ते आमच्या जवळ येऊ शकत नव्हते. आम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न करायचो पण लाटांमुळे परत दूर फेकलो जायचो. असा थरार तासन्तास चालू होता. परंतु हिंमत हारली नाही. नाैदलाच्या जवानांनी मला दोर टाकून वर उचलले; परंतु माझा तीनदा प्रयत्न अयशस्वी झाला. चौथ्या प्रयत्नात माझा जीव वाचला, हे सांगताना अभिषेकला गहिवरून आले.
दोडीच्या दोघा युवकांनी अनुभवला जीवन-मृत्यूचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 01:27 IST
आमच्या बार्जची हनमॅन प्लॅटफार्मवर टक्कर होऊन पाठीमागच्या बाजूस मोठे छिद्र पडले आणि बार्जमध्ये हळूहळू पाणी घुसू लागले. बार्जवरील रेडिओ ऑफिसमधून आम्हाला लाइफ जॅकेट व बाॅयलर सूट घालण्याचे सांगण्यात आले आणि आम्ही १० ते १५ जण मिळून एकमेकांचे हात पकडत समुद्रात झोकून दिले. प्रचंड प्रमाणात उसळणाऱ्या लाटा, सुरू असलेला जोरदार पाऊस अशा संकट काळात पाण्यात चार-पाच तास मृत्यूशी झुंज देत राहिलो. अखेर नाैदलाने आमची सुटका केली आणि आमचा पुनर्जन्मच झाला....
दोडीच्या दोघा युवकांनी अनुभवला जीवन-मृत्यूचा थरार
ठळक मुद्देबुडालेल्या बार्जची कथा : खवळलेल्या समुद्रात चार ते पाच तास संघर्ष