पंचवटी : दिंडोरीरोडवरील मायको दवाखान्याजवळ पहाटेच्या सुमाराला टोळक्याने दोन दुचाकींची जाळपोळ केल्याची घटना घडली. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण असून, पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी पंचवटीत दुचाकी जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. दिंडोरीरोडवर दुचाकी जाळपोळीची घटना ही नागरिकांत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वी याच परिसरात जबर मारहाणीची घटना घडली होती. त्यातूनच दुचाकी जाळपोळीची चर्चा सुरू आहे. या घटनेत एक बजाज डिस्कव्हर व एक अॅक्सेस अशा दोन दुचाकी जळाल्या आहेत. पहाटे तीन वाजेच्या सुमाराला ३ ते ४ जणांच्या टोळीने या दुचाकी पेटवून दिल्याचे काहींनी बघितल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरात राहणारे गुलाब पाटील व उमेश घुगे यांनी नेहमीप्रमाणे रात्रीच्या सुमारास हौसिंग बोर्ड इमारतीच्या बाहेर आपल्या मालकीच्या बजाज डिस्कव्हर (क्र. एमएच १५ सीपी-३२३६) व अॅक्सेस (क्र. एमएच १५ बीएन-११) या गाड्या उभ्या केल्या होत्या. रात्री समाजकंटकांनी त्या पेटवून दिल्या. सकाळी काहीतरी जळण्याचा वास येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पाहणी केली असता दोन दुचाकी जळाल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत डिस्कव्हर अर्धी, तर अॅक्सेस थोड्या प्रमाणात जळाली आहे. (वार्ताहर)