नाशिक : वनपरिक्षेत्रातील गंगाम्हाळुंगी परिमंडळांतर्गत येणाऱ्या गणेशगाव त्र्यंबक येथून दरी-मातोरीकडे शेतावर जाणाºया दुचाकीस्वार युवकाला बिबट्याने मंगळवारी (दि.११) पहाटे ५ वाजेच्या सुमारास किरकोळ जखमी केल्याची घटना घडली. बिबट्याचा रस्ता ओलांडण्याची वेळ आणि दुचाकीस्वाराची जाण्याची वेळ एकच झाल्याने बिबट्याने झडप घातली. या पाच दिवसांत या परिमंडळांतर्गत घडलेली ही दुसरी घटना आहे.पश्चिम वनविभागाच्या नाशिक परिक्षेत्रातील जवळपास सर्वच परिमंडळांमधील गावांमध्ये बिबट्याचा संचार आढळून येत आहे. तसेच गंगाम्हाळुंगी परिमंडळातील गावांमध्ये अंदाजे तीन बिबट्यांचा संचार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुरूजपाडा येथील रहिवासी असलेला युवक समाधान सखाराम नडगे (२५) हा युवक दुचाकीवरून पहाटेच्या सुमारास गणेशगाव त्र्यंबकमार्गे दरीमातोरीकडे शेतीवर जात होता. त्यावेळी एका बिबट्याने रस्ता ओलांडत असताना गणेशगाव त्र्यंबक शिवारात त्याच्या दिशेने झेप घेतली. यावेळी बिबट्याचा पंजा पायाला लागल्याने तो जखमी झाला. सुदैवाने बिबट्या माघारी न फिरता शेतात पळून गेला.यामुळे समाधान बचावला. घटनेची माहिती मिळताच सकाळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समाधानची शेतावर जाऊन भेट घेत जबाब नोंदविला. त्याच्या जखमेची पाहणी केली असता, मांडीला किरकोळ स्वरूपाची जखम झाली असून, त्याबाबत माहितीची नोंद केली. असल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.
बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 01:22 IST