प्रत्येक प्रभागाच्या मतदारयादीत दोन हजार नावांचा घेाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 01:22 AM2022-06-30T01:22:21+5:302022-06-30T01:23:45+5:30
महापालिकेच्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ असून जवळपास प्रत्येक प्रभागात दोन ते अडीच हजार मतदारांच्या नावांबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे त्यावर आधारित आरक्षणदेखील चुकीचे झाल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे, तर शिवसेनेच्या वतीने देखील मतदारयाद्यांमधील घोळ तपासण्यात वेळ जात असल्याने हरकती घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली आहे.
नाशिक- महापालिकेच्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ असून जवळपास प्रत्येक प्रभागात दोन ते अडीच हजार मतदारांच्या नावांबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे त्यावर आधारित आरक्षणदेखील चुकीचे झाल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे, तर शिवसेनेच्या वतीने देखील मतदारयाद्यांमधील घोळ तपासण्यात वेळ जात असल्याने हरकती घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली आहे. नाशिक महापालिकेची मतदार यादी २३ जून रोजी प्रसिध्द झाली असून १ जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे. मात्र, ही मुदत अत्यल्प आहे. मुळातच एकेका प्रभागात दोन हजारांहून अधिक मतदारांच्या नावाबाबत तक्रारी आहेत. मोठ्या प्रमाणात मतदारांच्या नावांचा गोंधळ झाल्याने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या मतदारांच्या संख्येच्या हिशोबाने जाहीर करण्यात आलेले प्रभागांचे आरक्षणही धोक्यात आले आहे, अशा याद्या तयार करणाऱ्या मनपाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या हेतूविषयीच संशय निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वपक्षीय तांत्रिक समिती गठीत करून हा घोळ निस्तरावा, असे मनसेच्या निवेदनात म्हटले आहे. या वेळी मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर, सचिन भोसले, संतोष कोरडे, अक्षय खांडरे, भाऊसाहेब निमसे, नितीन साळवे, विक्रम कदम, नितीन माळी, योगेश लभडे, संदीप भवर, कौशल पाटील, विजय आगळे, पंकज दातीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेनेच्या वतीने देखील महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. प्रभाग हद्दीनुसार त्या नासल्याने त्यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळत असल्याने याबाबत आक्षेप नोंदविण्यासाठीची मुदत १५ दिवसांनी वाढवून मिळावी, अशा मागणीचे निवेदन आयुक्त रमेश पवार यांना देण्यात आले. या वेळी माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे,बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, नाना पाटील,संदीप लभडे आदी उपस्थित होते.