मालेगाव : तालुक्यातील हाताणे येथील ग्रामपंचायतीच्या दोन महिला सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. शौचालय नसल्याच्या कारणास्तव तसेच जात प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. शौचालय नसल्याच्या कारणामुळे सदस्यत्व रद्द होण्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे तालुक्यातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांत खळबळ उडाली आहे. शासनाने स्वच्छ भारत व हगणदारीमुक्त गाव योजनेत सदस्यांना शौचालयाची सक्ती केली आहे. यासाठी पंचायत समितीकडे जबाबदारी देण्यात आली. गाव हगणदारी मुक्त या योजनेची अंमलबजावणी राज्यात काटेकोरपणे केली जात आहे. घरोघरी शौचालयासाठी निधी देण्यात येऊन ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात येत आहे. यामुळे निवडणूक लढविणाऱ्यांना शौचालय नसल्याने निवडणुकीस बंदी घालण्यात आली आहे, तर निवडणुकीनंतर सदस्य रद्द करण्यात येत आहे. असाच प्रकार हाताणे गावात उघड झाला आहे. गावातील लुभाण बिरारी यांनी ग्रामपंचायत सदस्य शोभा पवार, कापुरसिंग झाल्टे, मुक्ताबाई कदम व ताईबाई गायकवाड यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी व ग्रामसेवक यांच्याविरोधात येथील अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत याचिकेत केलेले आरोप उघड झाले आहेत. त्यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी शोभा पवार व ताईबाई गायकवाड यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
दोन ग्रामपंचायत महिलांचे सदस्यत्व रद्द
By admin | Updated: April 4, 2016 00:11 IST