सिडको : गेल्या काही दिवसांपूर्वी गणेश चौक भागात एका लहान बालकासह अन्य एका मुलीला डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली होती. या पाठोपाठ आज पुन्हा गणेश चौकालगत असलेल्या भागातील सप्तशृंगी चौकातील एकाच घरातील दोन मुलींना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिडकोतील गणेश चौक भागातील सप्तशृंगी चौकात एका कुटुंबातील दोघा मुलींना गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडी व ताप येत होता. यामुळे त्यांच्या घरातील व्यक्तींनी या मुलींना जवळच असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. परंतु यानंतरही ताप उतरत नसल्याने त्यांनी मुंबई नाका येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी या दोघी मुलींचे रक्ताचे नमुणे घेऊन तपासले असता त्यांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले आहे.सिडको भागात गेल्या काही दिवसांपूर्वी गणेश चौकातील एकाच घरातील दोघांसह आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या अन्य चार ते पाच जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली होती. यापाठोपाठ आज पुन्हा सप्तशृंगी चौकातील एकाच घरातील दोन्ही मुलींनाही डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने आरोग्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. सदर आजाराची लागण झालेल्या घरासमोरील मोकळ्या जागेवर पावसाचे पाणी साचलेले असून त्याचा निचरा होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढण्याची शक्यताही परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबरोबरच सिडकोतील अनेक ठिकाणच्या मुख्य रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचलेले असून याकडे मनपाने लक्ष देत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
सिडकोत पुन्हा दोन डेंग्यूचे रुग्ण
By admin | Updated: August 9, 2016 01:10 IST