नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मोटारी नदीपात्रात धुता कामा नये यासाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाने संरक्षक जाळ्या बसविण्यासाठी जागांची निश्चिती दोन दिवसांत करावी, असे आदेश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिले आहेत. त्याचबरोबर पालिकेला गोदावरी प्रदूषणासंदर्भातील तक्रारी ऐकण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.गोदावरी गटारीकरणविरोधी मंचच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेला अनुसरून उच्चस्तरीय समिती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे. या समितीची बैठक बुधवारी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उच्च न्यायालयाच्या विविध निर्देशांचे पालन करण्याच्या दृष्टीने डवले यांनी सूचना केल्या.रामकुंड आणि गोदापात्र परिसरात मोटारी धुण्यास प्रतिबंध करण्यासाठी संरक्षक जाळ्या बसविण्यासाठी महापाालिका आणि पोलीस आयुक्तालयावर जबाबदारी देण्यात आली असून, अद्याप हे काम पूर्ण झाले नसल्याने डवले यांनी दोन्ही यंत्रणांना दोन दिवसांची मुदत दिली आहे. रामकुंड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी तातडीने जागा निश्चित कराव्या, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, प्राजक्ता बस्ते, याचिकाकर्ते राजेश पंडित उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पोलीस-पालिकेला दोन दिवसांची मुदत
By admin | Updated: January 1, 2015 01:31 IST