मालेगाव मध्य : तालुक्यातील पिंपळगाव येथील दोन दुकानांमध्ये छापा टाकून विशेष पोलीस पथकाने पेट्रोल व देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाºया दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष पोलीस पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस कर्मचारी तुषार आहिरे, अभिजित साबळे, दिनेश शेरावते यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतच्या पत्र्याच्या शेडसमोरील् गंगासागर अॅटो गॅरेज अॅण्ड कोल्ड्रिंग दुकानात दुकानमालक सुनील माधव पवार (४०, रा. पिंपळगाव, ता. मालेगाव) ज्वलनशील पदार्थ पेट्रोल लोकांच्या जीवितास व मालमत्त्येस धोका निर्माण होईल अशा रीतीने बेकायदेशीररीत्या बाळगून होता. तो एकूण २६४० रुपये किमतीच्य एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये ३० लिटर पेट्रोल विक्री करताना मिळून आला. तसेच २ हजार १२४ रुपये किमतीच्या देशी दारू प्रिन्स संत्र्याच्या एकूण २७ बाटल्या आढळून आल्या.गंगाई मोबाईल शॉपी दुकानाचा मालक योगेश दिलीप पवार (३०) याच्या ताब्यात विदेशी दारूच्या इंपेरियल ब्लूच्या ३ बाटल्या, मॅगडॉल नं .१ च्या २ बाटल्या मिळून आल्या. याच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल व १००० रुपयांचे दोन मोबाइल असा एकूण ४० हजार ६३४ रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी संशयिताविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध दारू विकणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:19 IST