लोकमत न्यूज नेटवर्कसुरगाणा : तालुक्यात मागील काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस असूनही मोठा पाऊस झाला नसल्याने नदी, नाले, ओहळ यांना पाणी कमी उतरल्याने पाण्याचा खळखळाट दिसून आलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पाझर तलाव, गावतळे, वनतळे आदी पूर्णपणे भरू शकले नाहीत. काही दिवसांपासून येथे कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. पाऊस समाधानकारक असल्याने सर्वत्र शेतीकामांना वेग आला आहे; मात्र अद्यापही मोठा पाऊस नसल्याने नदी, नाले, ओहळ दुथडी भरून वाहू शकलेले नाहीत. काही ठिकाणी बंधारे, पाझर तलाव बऱ्यापैकी भरले असले, तरी सांडव्यावरून पाणी वाहून जाण्याइतपत भरलेले नाहीत. सुरगाणा येथील पाझर तलाव भरला आहे; मात्र अजूनही सांडवा ओसंडून वाहणे बाकी आहे. पुढील काही दिवसांत मोठा पाऊस होऊन नदी-नाले दुथडी भरून वाहताना दिसून येतील व सर्वत्र पाणी साठवणीची ठिकाणे भरून जातील, असे बोलले जात आहे.
सुरगाणा येथील मोतीबाग तलाव तुडुंब
By admin | Updated: July 5, 2017 00:06 IST